ढोलकीने मला खूप काही दिलंय. आता मी ढोलकीसाठी काही करण्याची वेळ आली आहे. तसा माझा प्रयत्न आधीपासून सुरूच होता. पण येत्या काळात मी ढोलकीला स्वतंत्र वाद्य म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजवर लावणीसाठी साथीला वाजवलं जाणारं वाद्य हीच ढोलकीची ओळख होती. पण ढोलकी तबल्यासारखी स्वतंत्र तालवाद्य म्हणूनही वाजवता येऊ शकते, यासाठी मी प्रयत्नशील आहे. तबल्याचे दोन-तीन तासाचे सोलो कार्यक्रम होतात, तर ढोलकीचे का नाही, असा प्रश्न मला कायम पडत आला आहे. यातूनच मी ढोलकीतून वेगळं काही शास्त्रीय वाजवता येतं का? शास्त्रीय गायनाला तिची साथ मिळू शकते का, ते मी अजमावून पाहत आहे. जर कथकसारखेच तोडे लावणीनृत्यात आहेत, तर मग तबल्याप्रमाणेच ते तोडे ढोलकीतून का निघू शकणार नाही? अर्थात ढोलकीचे बोल तबल्यासारखे नसतील, पण म्हणून काय झालं? ते ढोलकीसारखे तर नक्कीच असतील! म्हणूनच यापुढे लावणी म्हणजे ढोलकी नाही, तर ढोलकी म्हणजे स्वतंत्र तालवाद्य, अशी ढोलकीची नवी ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. ती ओळख मी निर्माण करेन याची मला खात्री आहे.